पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासात भर पडेल. ते म्हणतात, “सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण, धर्मचिकित्सा, सामाजिक सुधारणांचे कायदे, विविध प्रकारच्या सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिक व कृषी सुधारणांच्या बाबतीत केलेले अलौकिक कार्य आणि राजा असूनही आपल्या वर्गीय हिताविरोधी बंड करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी झपाटलेल्या सयाजीरावांचे नाव फुले- शाहू-आंबेडकर चळवळीशी निगडित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला तर ते सत्याशी व इतिहासाशी सुसंगत ठरेल. पुरोगामी चळवळीने या चारही महामानवांच्या ऐतिहासिक कार्याचा विचार करून भविष्यात वाटचाल केली पाहिजे. गंगेचे अलाहाबादचे विस्तीर्ण पात्र पाहताना गंगोत्रीकडे दुर्लक्ष होऊ नये.”
 वरील असंख्य पुरावे विचारात घेता फुल्यांच्या नंतर ज्या शाहू महाराजांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व राजर्षी शाहूंचे योगदान वादातीत आहे हे जसे खरे त्याचप्रमाणे शाहू महाराजांच्या कार्याला बडोदा आणि सयाजीरावांकडून मिळालेली प्रेरणा, मार्गदर्शन, नैतिक पाठबळ आणि सहकार्य हे वादळातील दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले हे सुद्धा आपण दिलदारपपणे स्वीकारण्याची गरज आहे.

●●●
महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ५१