पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
राजर्षी शाहू

 बडोदा आणि कोल्हापूर ही भारतातील दोन प्रागतिक संस्थाने आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही मराठी संस्थाने ज्याप्रमाणे पुरोगामी धोरणांच्या दृष्टिकोनातून परस्परांशी संवादी नाते ठेवून होती त्याचप्रमाणे रक्तसंबंधांच्या दृष्टीनेही या दोन संस्थानांचा ८२ वर्षांचा प्रदीर्घ ऋणानुबंध होता. या दोन संस्थानांच्या संबंधाने लेखन- संशोधन न झाल्याने हा इतिहास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असला तरी अज्ञात आहे. सयाजीराव आणि शाहू यांच्या प्रागतिक धोरणांमध्ये असणारे कमालीचे साम्य व प्रागतिक कोल्हापूरच्या जडणघडणीसाठी बडोद्याने पुरवलेल्या ज्ञानऊर्जेची दखल आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासकारांबरोबरच शाहू इतिहासकारांनीही अजिबात घेतली नाही. त्यामुळे बडोद्याने आणि सयाजीरावांनी महाराष्ट्राला काय दिले हे आपल्याला माहीत नाही. महत्त्वाचे म्हणजे शाहू महाराजांनी कोल्हापूरचा पुरोगामी वारसा बडोद्याकडून घेतला होता हा एक 'जाणीवपूर्वक' अंधारात ठेवलेला इतिहास आहे.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ६