पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजी- शाहू पत्रव्यवहार चाळला तरी महाराजा सयाजीराव शाहू महाराजांसाठी 'फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड' होते या ऐतिहासिक सत्यावर पूर्ण प्रकाश पडतो.
 ‘ब्राह्मणांनी आमचा इतिहास चुकीचा लिहिला म्हणून आम्ही नव्याने आमचा इतिहास लिहित आहोत' असे म्हणत लिहिलेला पुरोगामी इतिहास जेव्हा सयाजीरावांना 'कात्रजचा घाट' दाखवतो तेव्हा आमचा हा 'पुरोगामी इतिहास लिहिला नसता तर बरे झाले असते' अशी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. आपण जेव्हा सयाजीरावांची धोरणे, कायदे आणि उपक्रम समजून घेतो त्यावेळी या सर्व सोयीस्करपणाचा उलगडा होतो. त्यामुळेच सयाजी-शाहू या वैचारिक ऋणानुबंधातील सर्व चढ-उतार 'जसे घडले तसे' आणि संजय सुब्रमण्यम यांच्या 'जोडलेला इतिहास' (Connected History) या संकल्पनेच्या आधारे जोडून समजून घेतले तर आपला एक अत्यंत धक्कादायक पुरोगामी आणि खरा इतिहास स्पष्टपणे पुढे येतो जो अत्यंत वैभवशाली आणि आपल्याला संवादाची परंपरा आहे याची जाणीव अधोरेखित करणारा ठरतो.

 आधुनिक महाराष्ट्रातील पुरोगामित्वाचे 'फुले-शाहू- आंबेडकर' मॉडेल गेली ६० वर्षे महाराष्ट्राचे बौद्धिक नेतृत्व करत आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सर्वोच्च मानवी मूल्यांचे जणू ते प्रतीकच बनले आहे. आपण जेव्हा या तीन्हीही महापुरुषांच्या जीवनकार्याचा शोध घेऊ लागतो तेव्हा या

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ७