पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महापुरुषांच्या विचार आणि कार्यातील परस्परसंबंध आपण आग्रहाने मांडत असतो. परंतु या तिघांच्याही जीवनातील समकालीन संदर्भ तपासले असता महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी या तिघांचा सकारात्मक आणि रचनात्मक सामाजिक संवाद होता याचे असंख्य पुरावे उपलब्ध असल्याचे आढळते. त्या दृष्टीने महात्मा फुल्यांच्या जीवनकार्यातील सयाजी संदर्भ शोधल्यानंतर जेव्हा आपण शाहू महाराजांचा सयाजीरावांशी नेमका कसा संवाद होता हे शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक सुखद धक्के बसतात.
सयाजीरावांचे समकालीन : राजर्षी शाहू
 सयाजीराव वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत नाशिक जिल्ह्यातील कवळाण्यासारख्या छोट्या गावात पाटीलकीचे वतन असणाऱ्या सामान्य शेतकरी कुटुंबात वाढले होते व ते दत्तक जाईपर्यंत निरक्षर होते. गावातील सर्व जातीधर्माच्या गोरगरीब सवंगड्यांमध्ये सयाजीरावांचे बालपण गेले. बडोद्याला दत्तक गेल्यानंतर सर इलियटसारख्या व्यापक दृष्टी असणाऱ्या शिक्षकाचा सहवास, उपजत चौकस बुद्धी, कष्ट आणि वाचन यातून सयाजीरावांमधील समाजक्रांतिकारक अतिशय गांभीर्याने घडला. सयाजीराव बडोद्याच्या गादीवर महाराष्ट्रातून १८७५ ला दत्तक गेले आणि १८८१ ला त्यांनी बडोद्याचा राज्यकारभार हाती घेतला. त्यावेळी सयाजीरावांचे वय १८ वर्षे होते.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ८