पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तर शाहू महाराज १८९४ ला कोल्हापूर संस्थानातील कागल येथून कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले आणि त्याचवर्षी राज्यकारभाराचे अधिकार त्यांना प्राप्त झाले. त्यावेळी शाहू महाराजांचे वय २० वर्षे होते. म्हणजेच एका अर्थाने हे दोन महान राजे समकालीन होते. सयाजीरावांना ६४ वर्षे असा प्रदीर्घ काळ राज्यकारभार करता आला. • दुर्दैवाने शाहू महाराजांना अवघी २८ वर्षे राज्यकारभार करता आला. शाहूंना दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी बडोद्याची 'प्रतिसृष्टी' कोल्हापुरात उभी केली असती हे त्यांच्या लढवय्या स्वभावावरून निश्चितपणे म्हणता येईल.
 सयाजीरावांनी आपल्या पुरोगामी राज्यकारभाराला शाहू महाराजांच्या आधी १३ वर्षे आरंभ केला. महाराजा सयाजीराव आणि शाहू महाराज हे दोघे परस्परांचे नातेवाईक होते. या दोघांमधील पुरोगामी वैचारिक संवाद १९०० च्या कोल्हापुरातील वेदोक्तापासून ते १९२२ मध्ये राजर्षी शाहूंच्या निधनापर्यंत म्हणजे २२ वर्षांचा होता. या २२ वर्षातील सयाजी- शाहू संबंध समजून घेणे आणि शाहूंच्या पुरोगामी धोरणातील 'सयाजीविचार ' अधोरेखित करणे हाच उद्देश या चर्चेमागे आहे. या दोघांच्या एकूण जीवनप्रवासाचा विचार करता सयाजीरावांच्या वाट्याला इंग्रजांशी तीव्र संघर्ष आणि ब्राह्मणी व्यवस्थेशी तुलनेने सौम्य संघर्ष तर शाहूंच्या बाबत ब्रिटिशांशी संवाद तर ब्राह्मणी व्यवस्थेशी जीवघेणा संघर्ष आढळतो. वेदोक्ताने शाहू महाराजांमधील समाजक्रांतिकारक जन्माला घातला. तर अशा

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ९