पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजा रवी वर्माची दरबार हॉलच्या चित्रांसाठी भारतभर भ्रमंती
 दरबारहॉलसाठी कमीत कमी बारा ते चौदा तैलचित्रे लागण्याची शक्यता टी. माधवरावांनी वर्तवली. बारा-चौदा चित्रे तयार करायला बराच अवधी लागणार होता. त्यात परत राजा रवी वर्मांना हे काम करण्यासाठी भारतभर फिरून, अभ्यास करून, चित्र काढावी लागणार होती. त्यामुळे भरपूर वेळ घेणारं हे काम होतं. राजा रवी वर्मांना हे कळत होतं की, या कामात देशभर खूप भटकंती करावी लागणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून महाराज म्हणाले, “मी नुकताच परदेशातून फिरून आलो आहे. तिथले राजवाडे, तिथली चित्रांनी सजविलेली सभागृहं मी पाहिली आहेत. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या; पण ही चित्रे तुम्हीच पुरी करावी, अशी आमची इच्छा आहे. देशभर फिरण्याची मुळीच चिंता करू नका. त्यासाठी आपल्याला जो खर्च लागेल, तो आमच्या दरबारातून दिला जाईल.” त्यावर थोडे कठोर होत राजा रवी वर्मा म्हणाले, “महाराज, त्याची काही आवश्यकता नाही. तो माझा अभ्यासाचा विषय आहे. त्याचा खर्च मी आनंदाने करेन.” सयाजीराव एकदम पुढे झाले आणि राजा रवी वर्माच्या खांद्यावर हात ठेवून, अतिशय नम्रपणे म्हणाले, "माफ करा, आपण राजे आहात. हे आम्ही विसरलो होतो. पुन्हा आमच्या हातून अशी चूक होणार नाही” महाराजांच्या मोठेपणाचा आणि नम्रतेचा अनुभव घेऊन राजा रवी वर्मा बंधू राज वर्मास घेऊन आपल्या

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २६