पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किलीमानूर गावी आले. सयाजीराव महाराजांनी टाकलेली जबाबदारी खूप मोठी होती. त्याची जाणीव रवी वर्मांना होती. त्याकामासाठी उत्तर प्रदेश, देशातली सर्व धर्मस्थळं, अयोध्या, मथुरा, तक्षशिला ही ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणं एकदा नजरेखालून घालण्याचे राजा रवी वर्मांनी ठरविले. दोघे भाऊ भारतभर फिरले. तीन-चार महिने प्रवास करून ते किलीमानूरला परतले. राजा रवी वर्मांना हवा असलेला अभ्यास या प्रवासात झाला नाही. त्यांना जे हव होतं, तसा तो परिसर आता राहिलेला नव्हता. त्यामुळे ते निराश झाले. त्यांचे चित्रकार काका राज वर्मांनी त्यांना कलाकारानं कसे चित्र काढावे, काय गोष्टी टाळाव्यात हे समजून सांगितलं, “रामायण, महाभारत तू तुझ्या कल्पनेतून साकार. तुझी कल्पकता हीच चित्रकाराची खरी ओळख आहे.” असे मामांनी समजावल्यावर राजा रवी वर्मांनी बडोदा दरबाराच्या कामाला सुरवात केली.

 १८८८ ते १८९० या दोन वर्षात राजा रवी वर्मांनी या कामाला स्वत:ला झोकून दिलं. पौराणिक कथेतले एक एक चित्र पूर्ण करत चौदा चित्रे पूर्ण झाली. त्यासाठी त्यांनी व्यास - वाल्मीकी, नल-दमयंती, अर्जुन-सुभद्रा, द्रौपदीवस्त्रहरण, हरिश्चंद्र-तारामती, सीतास्वयंवर, देवकी - कृष्ण, असे अनेक विषय निवडले होते. ही चित्र पूर्ण झाली तेव्हा त्या कलाकृतींची त्रिवेंद्रममध्ये खूप चर्चा झाली. त्रिवेंद्रमचे महाराज आणि बडोद्याचे महाराज यांच्या परवानगीने त्या चित्रांचं प्रदर्शन प्रथम त्रिवेंद्रममध्ये भरविले गेले.

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २७