पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

_

या प्रदर्शनाला शेकडो लोकांची गर्दी झाली होती. येणाऱ्या लोकांनी देवांची चित्रे म्हणून भाविकपणे चित्रांसमोर डोके टेकवून नमस्कार केले. त्रिवेंद्रमनंतर राजा रवी वर्मा मुंबईला आले. महाराजा सयाजीरावांच्या परवानगीने त्यांनी मुंबईत त्या चित्रांचं प्रदर्शन भरविलं. मुंबईत हजारो लोकांनी ही चित्रं पाहिली आणि त्या चित्रांचे काढलेले फोटो भारतभर वाटले गेले. आता ज्यांच्यासाठी ही चित्रे रेखाटली होती त्यांना देण्याची वेळ आली होती. चित्रे घेऊन राजा रवी वर्मा बंधू राज वर्मासह बडोद्याला गेले.
राजा रवी वर्माचे बडोदा वास्तव्य
 बडोद्याच्या रेल्वेस्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी सयाजीराव महाराजांचे खास सचिव आणि सेवकवर्ग हजर होता. राजा रवी वर्मांचे सर्व चित्रासह बडोद्यात आगमन झाले. महाराज काही कामासाठी नवसारीला गेले होते आणि दोन दिवसात परत येणार होते. त्यादरम्यान राजा रवी वर्मा आणि बंधू राज वर्माची जबाबदारी खास सचिवांकडे सोपवली होती. त्यानुसार या दोघांची राहण्याची व्यवस्था नवीन बांधलेल्या लक्ष्मीविलास पॅलेसच्या आवारात असलेल्या एका हवेलीत करण्यात आली होती. राजा रवी वर्मानी हवेलीत आल्यावर त्रिवेंद्रमहून आणलेल्या चित्रांवर काही सुधारणा करायला सुरुवात केली. दोन दिवसांनंतर महाराज नवसारीहून परत आले.

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २८