पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दरबार हॉलमध्ये ही चित्र कुठे व कशी लावावीत हे ठरवायला राजा रवी वर्मा यांना सांगितले होते. पण त्याआधी या चित्रांचे बडोद्यात प्रदर्शन करावे, अशी विनंती राजा रवी वर्मा यांनी महाराजांना केली. महाराजांना ही कल्पना खूप आवडली. दरबारात एकदा ही चित्रे लावली गेली की आम जनतेला सर्व चित्रं बघण्याचा आनंद आणि संधी मिळणार नाही, या विचाराने महाराजांनी या प्रदर्शनास परवानगी दिली कारण मुंबईत या चित्रांनी सर्वांच्या मनात घर केले होते. काढलेल्या चित्रांच्या फोटांची विक्री मोठ्या प्रमाणावर बरेच दिवस चालू होती. त्यावरून ही चित्रे रंगीत छायाचित्रात करून विकण्याची कल्पनाही महाराजांनी राजा रवी वर्मा यांना तेव्हा दिली. काळाच्यापुढे दूरदृष्टी असणाऱ्या महाराजांचा व्यावसायिक दृष्टिकोन वाखाणण्याजोगा होता. यावर राजा रवी वर्मा महाराजांना म्हणाले होते, “महाराज चित्र काढणे एवढं मी जाणतो. पण त्याची छपाई, त्याचा प्रसार हे मी जाणत नाही."
 त्यावर महाराजांनी फार मार्मिक उत्तर दिले होते, "राजाजी, काही गोष्टी उपजतच येतात. काही गोष्टी शिकाव्या लागतात. शिकल्याने साऱ्या गोष्टी येतात.”
 त्या कृष्णधवल चित्रांना एवढी प्रसिध्दी मिळाली होती की, या चित्रांचा एक संच महाराजांपर्यंतही पोहोचला होता. महाराजांना आनंद या गोष्टींचा झाला होता की, आपल्या भारतीयांना चित्र

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ३१