पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाहायची सवय लागत आहे. आपल्या लोकांमध्ये चित्रकलेबद्दल अभिरुची निर्माण होण्यासाठी आपल्या दरबारातील चित्रांची रंगीत छायाचित्रे काढून त्याच्या प्रति केल्या तर त्यांना आनंदच होणार होता. ही चित्र मूळ रंगात, नाना आकारात करून लोकांच्या घराघरांत पोहोचतील आणि लोकांना चित्र पाहण्याची एक दृष्टी मिळेल ही महाराजांची इच्छा होती आणि हीच गोष्ट खूप आधीच दिवाण टी. माधवरावांनी राजा रवी वर्माला सांगितली होती. महाराज इंग्लंडला गेले तेव्हा तिथले चित्रसंग्रहालय पाहून खिन्न झाले होते. लंडनची नॅशनल गॅलरी ही उत्कृष्ट चित्रांचा संग्रह असलेली पिक्चर गॅलरी आहे. पण तो संग्रह ठेवला आहे ती इमारत खूपच खराब आहे. महाराजांचे कलासक्त मन यामुळे जागृत झाले होते. सुंदर कलाकृतींना ठेवायची जागाही सुंदरच असायला हवी या विचाराने त्यांनी पुढे बडोद्यात चित्रसंग्रहाकरिता बऱ्याच सुधारणा केल्या.
 काही दिवसांत राजा रवी वर्माच्या चित्रांचं प्रदर्शन बडोद्याच्या उद्यानामध्ये असलेल्या महालात भरवलं गेलं. चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी किती माणसं आली होती हे मोजण्यासाठी चित्रप्रदर्शनाच्या प्रवेशद्वारात एक खड्यांनी भरलेला छोटा रांजण ठेवला होता. त्याच्या बाजूला रिकामा रांजण ठेवला होता. चित्र पाहून जाणाऱ्यांनी फक्त एक खडा उचलून रिकाम्या रांजणात टाकायचा होता. पहिल्या दिवशी प्रदर्शन संपल्यावर रांजणात सहाशे खडे होते. हे पाहून राजा रवी वर्मा आणि महाराज या

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ३२