पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे?” महाराजांनी तबकावरचे आवरण उघडण्याची त्यांना विनंती केली. तसे महाराजांची आज्ञा राजा रवी वर्मानी पाळली. दोन मोठ्या तबकांमध्ये नाना रंगाच्या विंडसर न्यूटन कंपनीच्या रंगाच्या ट्युबा होत्या. त्यात राजा रवी वर्मांच्या आवडत्या रंगाचे नेपल्स यलो, टेरा सोनिया, अल्ट्रा मरिन, गॅमबोग आणि अत्यंत आवडता पर्शियन ब्ल्यू भरपूर प्रमाणात तबकात दिसत होता. तिसऱ्या तबकात वेगवेगळ्या आकाराचे रंगकामाचे ब्रश होते. रवी वर्मा त्या तबकांकडे पाहातच राहिले. महाराजांनी हे सर्व सामान राजा रवी वर्मांसाठी लंडनहून मागविले होते आणि यापुढेही महाराज त्यांना हे सामान मागावून देत जाणार आहेत असे त्यावेळी महाराजांनी त्यांना सांगितले. राजा रवी वर्मा एकदा माधवरावांना म्हणाले होते, "मुंबई - मद्रासमध्ये मिळणारे काही रंग कालांतराने फिके पडतात. ते अस्सल नसतात. "
 राजा रवी वर्माचे डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले होते. इतका जगावेगळा व काळजी करणारा राजा त्यांना आयुष्यात प्रथमच भेटला होता. त्यावेळेस राजा रवी वर्मा निःशब्द झाले होते. महाराजांनी त्यांच्या भावना ओळखल्या आणि म्हणाले, “आपण वयानं मोठे. काही बोलू नका. आपण चिंता करू नये. आपली भेट परत घडेल. आपला प्रवास सुखाचा होवो. आम्ही येतो.” महाराज निघून गेले. आनंद आणि अशा जगावेगळ्या राजाला सोडून जाण्याचे दुःख या दुहेरी भावनांच्या खेळात राजा रवी वर्मांना काहीच समजत नव्हते.

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ४५