पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठरल्यावेळी राजा रवी वर्मा यांना स्टेशनवर सोडायला घोडागाडी आली होती. सेवकवर्गासाठी दुसऱ्या गाड्यांची व्यवस्था केली गेली होती. घोडागाडीत बसून स्टेशनवर जाताना त्यांना सतत थोर राजा आठवत होता. स्टेशनच्या प्रवेशद्वारी घोडा गाडी थांबली आणि रवी वर्मा आश्चर्यचकित झाले. खुद्द दिवाणसाहेब त्यांना निरोप देण्यासाठी स्टेशनवर आलेले होते. घोडागाडीतून आगगाडीच्या डब्यापर्यंत तांबड्या रंगाचा गालिचा अंथरला होता. त्यावरून राजा रवी वर्मा राज वर्म्यासह डब्यात गेले तर सारा डबा सुवासिक फुलांनी बहरलेला होता. आधीच भारावलेले रवी वर्मा अशा निरोपाने अजूनच भारावून गेले. असा ह्रदयस्पर्शी निरोप ते पहिल्यांदाच अनुभवत होते आणि परत एकदा निःशब्द झाले होते. गाडी निघायची घटिका जवळ आली आणि त्याच वेळी दिवाणांनी एक शाही लखोटा राजा रवी वर्माच्या हातात दिला. आधीच एकावर एक भारावण्याचे प्रसंग घडत होते आणि आता हा लखोटा ! गाडी सुरू झाली होती आणि हळूहळू वेग घेत होती. स्टेशन मागे गेले. रवी वर्मांनी तो शाही लिफाफा उत्सुकतेने फोडला. ज्यात राजचिन्हांकित एक छोटंस पत्र होतं. त्यात लिहिलं होतं...
 Dear Rajaji,
 You are a prince amongst painter, and painter amongst the prince.

Yours loving

Sayaji


महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ४६