पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्तव्याची मार्गरेषा सरळ असते,
 तर सौंदर्याची रेषा वक्र असते,
 पण एकीचा अवलंब केली की,
 दुसरी आपोआप आपल्या मागे येते.

 'चित्रकला ही मूर्तिकलेची बहीणच' म्हणूनच मूर्तिकलेला राजाश्रय देणाऱ्या महाराजांचे लक्ष चित्रकलेकडेही जाणे अगदी स्वाभाविक आहे. खासकरून महाराज जेव्हा १८८७ ला युरोप प्रवासात तिकडची चित्रमंदिरे पाहून आले तेव्हा त्यांच्यातल्या कलासक्त जाणकाराची अभिरुची अधिक जागृत झाली नाही तर नवल ! आपल्या राज्यात हे सर्व घडावे हे त्यांना वाटणेही स्वाभाविकच होते. महाराजांनी युरोप प्रवासात सर्व प्रसिध्द चित्रमंदिरे खूप बारकाईने पाहिली. अवलोकन केली. या निरीक्षणाच्या दररोज डायरीत नोंदी केल्या. त्या चित्रांबद्दलचे आपले प्रामाणिक पण अभ्यासूवृत्तीने केलेले वर्णन अनेक वेळा त्यांनी पत्रांतून व्यक्त केलेले आहे. अनेक देशाच्या प्रवासातून निरनिराळ्या कालखंडाच्या तेथील संस्कृतीचा अभ्यास महाराजांना चांगल्या प्रकारे झाला होता. वस्तुतः संस्कृतीचा इतिहास म्हणजे सौंदर्य-प्रतीतासाठी मनुष्याने केलेल्या प्रयत्नांचा इतिहास होय..
 History of civilisation is the story of the development of man's conception of what is beautiful and good ! असे एक सुभाषित आहे; त्याप्रमाणे युरोपांतील संस्कृतीचा इतिहास

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ८