पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथालय सरदेसाईंच्या ताब्यात असल्यासारखे होते. यासंदर्भात सरदेसाई म्हणतात, “हिंदुस्थानच्या इतिहासावरील बहुधा कोणतेही महत्त्वाचे हे पुस्तक माझ्या वाचनातून सुटले नाही." सरदेसाईंचा विद्याव्यासंग सयाजीरावांच्या सहवासातच कसा विकसित झाला हे यातून स्पष्ट व्हावे.
वैचारिक परिवर्तन
 सयाजीरावांच्या सेवेत येण्याअगोदरचे सरदेसाई धार्मिक अंधश्रद्धा बाळगणारे होते. परंतु महाराजांच्या या ग्रंथालयातील ग्रंथांच्या वाचनाने त्यांच्यातील विज्ञानवादी अभ्यासक घडला. यासंदर्भात सरदेसाई लिहितात, “अशी चिकित्सक व बौद्धिक विचारांची पुस्तके वाचल्यावर माझी पूर्वीची धार्मिक अंधश्रद्धा नाहीशी होऊन मी एक प्रकारचा निरीश्वरवादी, विचारास पटेल ते आचरणात आणणारा स्वतंत्र विचारी बनलो. उपास तापास, भजन पूजन, सोवळे ओवळे ही सोंगे सर्व टाकून मी स्वतंत्र विचाराने शास्त्रीय शोधांचे ग्रहण करीत आलो आहे. घरांतही हे सर्व प्रकार मी मुद्दाम चालू केले. पुष्कळ वेळ प्रवासांत आगबोट- आगगाडीत मला काढावा लागल्यामुळे आगाऊ वाचनाची तयारी मी बरोबर ठेवीत असे. आगबोटीवर तर लेखनवाचन हाच मुख्य व्यवसाय. वर आकाश व खाली पाणी, भोजन फराळाची चंगळ, अशा त्या बोटीवरच्या प्रवासांत एकान्त तंद्रीच्या भावनेत इतिहासविषयक पुष्कळसे लेखन मी केलेले आठवते."

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / १०