पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्मसुधारणेतील सहभाग
 महाराजांच्या सहवासात सरदेसाईंमधील इतिहास लेखक नकळत घडत गेला. त्यासाठी विविध घटना कारणीभूत होत्या. १८९५ च्या दरम्यान वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने धर्मशास्त्रातील सत्य शोधण्याची मोहीम सयाजीरावांनी हाती घेतली होती. सरदेसाईंना या कामी महाराजांनी जबाबदारी दिली ती सुद्धा त्यांच्यातील लेखक घडवण्यास उपयुक्त ठरली. यासंदर्भात सरदेसाई म्हणतात, “महाराजांनी आपल्या धर्मकृत्यांत क्षत्रियांचे विधि वेदोक्त मंत्रांनी करण्याचा परिपाठ घातला; पूर्वीच्या उपाध्ये मंडळींना नोकरीतून कमी करून वेदमंत्रांनी कर्मे करणारे नवीन उपाध्ये नेमिले. या कामी महाराजांचे हुकूम बरोबर पाळले जात की नाही, पूजा, श्रावणी इत्यादी प्रसंगांत जे मंत्र म्हटले जातात ते वेदांतले की बाहेरचे हे तपासण्याचे काम त्यांनी मला सांगितले. त्यासाठी सर्व सोळा संस्कारांच्या विधींचे मराठी भाषांतर करून छापण्याचे काम मी केले." याच काळात २-३ वर्षे सयाजीरावांना संस्कृत शिकविण्याचे कामसुद्धा सरदेसाईंनी केले.

 १८९२ च्या युरोप प्रवासात महाराजांनी तार करून सरदेसाईंना युरोपला बोलावले. विशेष म्हणजे या तारेत महाराजांनी सरदेसाईंना स्पष्ट बजावले होते की, या परदेश प्रवासानंतरच्या प्रायश्चित्ताचा खर्च संस्थानाकडून मिळणार नाही. पहिल्या दोन परदेश प्रवासानंतर महाराजांना प्रायश्चित्तावर बराच खर्च करावा लागला होता. त्याची या सूचनेला पार्श्वभूमी होती. पुढे महाराजांनी आदेश काढून प्रायश्चित्ताची ही पद्धत बंद केली.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / ११