पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अडचणीचा होता. इंदिराराजेंना स्वतःच्या विवाहाविषयी वडिलांशी चर्चा करण्यात या नियमाचा अडथळा येत होता. अशा परिस्थितीत स्वतःच्या भावना मांडणारे सविस्तर पत्र वडिलांना लिहिण्याचा सल्ला सरदेसाईंनी इंदिराराजेंना दिला. तसेच इंदिराराजेंनी लिहिलेले पत्र सयाजीरावांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था त्यांनी केली. यामुळे इंदिराराजेंच्या विवाहविषयक भावना सयाजीरावांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. या पत्रानंतरच सयाजीरावांनी इंदिराराजेंच्या इच्छेप्रमाणे त्यांचा विवाह करून देण्याची ग्वाही आपल्या मुलीला दिली. रियासतकारांनी काढलेल्या पत्ररूपी तोडग्याचा हा परिणाम होता.
रियासतींचा जन्म
 सयाजीरावांना इतिहास ग्रंथातील मजकूर वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकवणे या त्यांच्या मुख्य कामासाठी ते लेखी टिपणे काढीत. याच टिपणांनी पुढे रियासतींना जन्म दिला. त्यातील पहिला खंड 'मुस्लिम रियासत' या नावाने १८९८ मध्ये बडोद्यातून प्रकाशित झाला. यानंतर इतिहास हे त्यांचे जीवन ध्येय झाले. पुढे मराठी रियासत, ब्रिटिश रियासत यांच्या आवृत्या १९३५ पर्यंत निघाल्या. १९२७ मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या त्रिशतसांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने 'Shivaji Souvenir' हा ग्रंथ संपादित केला. परमानंदांच्या अनुपुराणाचे संपादन सरदेसाईंनी केले. ते 'गायकवाड ओरिएंटल सिरिज' मध्ये प्रकाशित झाले.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / १३