पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 थोडक्यात रियासतींचे पहिले ८ खंड हे सरदेसाईंचे प्रमुख काम म्हणून सांगता येईल. ज्यावेळी मराठी इतिहासामध्ये वस्तुनिष्ठ ग्रंथ निर्माण झाले नव्हते अशा काळात मराठीत आपला इतिहास लिहिण्याचे काम महाराजांच्या सहवासामुळे आणि महाराजांनी दिलेल्या जबाबदारीमुळे नकळतपणे सरदेसाईंकडून झाले. यासंदर्भात सरदेसाई म्हणतात, “स. १९०० साली मराठ्यांचा इतिहास किती तुटपुंजा होता आणि आज त्याला भरीव रूप कसे आले आहे हा विचार माझ्या निरनिराळ्या आवृत्त्यांतून नजरेस आला म्हणजे या महनीय कामांत माझाही थोडा बहुत हातभार लागला याबद्दल मला कृतकृत्यता वाटते."
 महाराजा सयाजीराव हे कागदपत्रांच्या दस्ताऐवजीकरणाबाबत अत्यंत दक्ष असत. प्रत्येक बाबीची नोंद ठेवणे आणि त्या नोंदींचे कागद पद्धतशीरपणे जपून ठेवणे हे ते अगदी सुरुवातीपासून करत आले. भारतातील इतर कोणत्याही संस्थानिकाच्या कामकाजाचे दस्ताऐवजीकरण सयाजीरावांएवढे काटेकोरपणे नसेल. उदाहरण द्यायचे झाले तर १८८६ ला महाराजांनी त्यांच्या राजवाड्यातील खासगी मंदिरातील वार्षिक धार्मिक विधींची माहिती देणारा 'ऐनेराज मेहेल' हा ग्रंथ छापून घेतला. १८९२ मध्ये राजवाड्यातील धार्मिक विधींच्या खर्चाचे १००० पानांचे तपशीलवार बजेट महाराजांनी छापून घेतले होते. या पार्श्वभूमीवर महाराजांनी आपल्या कारकीर्दीतील आपला पत्रव्यवहार, भाषणे इ. सुद्धा छापून घेतले होते.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / १४