पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तयार करून त्यांच्याही वीस प्रती छापून ठेवल्या. वीस प्रतीच छापण्याचे कारण या लेखांचा उपयोग पुढील चरित्र - लेखकास व्हावा इतकाच होता. त्यांची पत्रेदेखील सर्वच एकदम प्रसिद्ध करण्याजोगी नव्हती. फक्त जुन्या बारनिशा फाटत चालल्या, त्यातून ही पत्रे वाचून मी एका संग्रहात आणली. सारांश, शिवाजीसारख्या राष्ट्रपुरुषाचे चरित्र लिहिण्यात ज्या अडचणी आज इतिहासकारास भासतात, तशा सयाजीरावांसंबंधाने पुढे भासू नयेत अशी सर्व सिद्धता मी परिपूर्ण करून ठेविली. हे सर्व काम मी चोख केले ते त्यासही पसंत पडले. त्यावरून त्यांची कल्पना तीव्र बनली की मीच त्यांचे समग्र चरित्र लिहावे. मी स्पष्ट कळविले, मी पगारखाऊ सेवक, चरित्रनायकाचे गुणदोष स्पष्ट सांगण्यास असमर्थ; व्यक्तीच्या पश्चात् चरित्र लिहिले जावे हा शहाण्यांचा रिवाज आहे."
महाराजांची नाराजी
 १९२५ मध्ये सरदेसाईंनी बडोदा संस्थानची नोकरी सोडून पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. याला वरील चरित्रलेखनाची पार्श्वभूमीसुद्धा आहे. कारण सरदेसाईंनी चरित्र लेखनास नकार दिल्यामुळे महाराज त्यांच्यावर नाराज झाले होते. बडोद्यात ३७ वर्षे राहिल्यानंतर सरदेसाईंना नोकरीतून मुक्त व्हावे असे वाटत होते. त्यात या नाराजीने भर घातली. महाराजांना मात्र सरदेसाई हवे होते. कारण महाराजांच्या नातवंडांच्या शिक्षणाची जबाबदारी सरदेसाईंकडे देण्याचा महाराजांचा विचार होता.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / १७