पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांच्या मनाविरुद्ध सरदेसाई नोकरी सोडून जात असल्यामुळे महाराजांनी त्यांच्या पेन्शनमध्ये ६० टक्के कपात केली. महाराजांचे एकूण धोरण बघता हा अपवाद म्हणावा लागेल. परंतु नातवांच्या भविष्याबाबतच्या काळजीपोटी महाराजांकडून हे अपवादात्मक कृत्य घडले असावे.
 पुढे सयाजीरावांचे उत्तराधिकारी आणि नातू प्रतापसिंह महाराज यांच्या राज्यारोहण सोहळ्याला सरदेसाईंना सन्मानाने बडोद्यात बोलावण्यात आले. सरदेसाई प्रतापसिंहांचे शिक्षक होते. प्रतापसिंहांनी सरदेसाईंची सयाजीरावांनी ६० टक्के कपात केलेली पेन्शन पूर्ण स्वरूपात सुरू केली. २ मार्च १९४७ रोजी बडोद्यामध्ये सरदेसाईंच्या इतिहासविषयक कार्याचा गौरव म्हणून त्यांना मानपत्र आणि साडेतीन हजार रु. ची थैली देण्याचा कार्यक्रम झाला. परंतु हे पैसे स्वतः न घेता सरदेसाईंनी त्यांचे पुण्याचे चितळे नावाचे मित्र ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी छापत होते त्या कामाला त्यातील दीड हजार रु. देण्याची विनंती सत्कार समितीला केली.
पेशवे दप्तराच्या कामाला सयाजीरावांची मदत
 सरदेसाई पुण्यात गेल्यानंतर पुढे कामशेत येथे राहू लागले. १९३३ मध्ये त्यांनी मुंबई सरकारच्या आर्थिक सहकार्याने पेशवे दफ्तर संपादनाचे काम ४ वर्षे केले. परंतु शेवटच्या वर्षी मुंबई सरकारने आर्थिक मदत थांबवली. अशा वेळी जदुनाथ सरकारनी त्यांना सयाजीरावांकडे मदत मागण्याची सूचना केली. महाराज

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / १८