पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सरदेसाईंनी रियासतमालेचा पाया १८९८ मध्ये घातला. परंतु रियासतकारांच्या मराठा रियासतीत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची शाखा राहिली होती याबाबत रियासतकार सरदेसाईंना खंत होती. रियासतकारांचे हे अपूर्ण राहिलेले काम स.मा.गर्गे यांनी पूर्ण करून मराठा इतिहास लेखनाचा सरदेसाईंनी सुरू केलेला प्रवास पूर्ण केला. थोडक्यात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे मराठ्यांच्या इतिहास लेखनातील पायाभूत काम इतिहासप्रेमी सयाजीरावांच्या प्रेरणेने सुरू झाले. यासंदर्भात सरदेसाईंनी दिलेली प्रांजळ कबुली सयाजीरावांच्या आश्रयाचे महत्त्व विशद करते. सरदेसाई म्हणतात, “पण पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही या न्यायाने माझा धीर चेपून आता तर मी रियासतकार म्हणून मिरवितो त्याचे श्रेय मुख्यतः त्या महाराजांस आहे." या कामाचा समारोप कोल्हापुरात झाला हा एक सुखद योगायोग आहे.
सयाजीरावांच्या बदलत्या मानसिकतेचे साक्षीदार

 सरदेसाईंनी महाराजांच्या सहवासात आपल्या आयुष्यातला सर्वाधिक काळ घालवला असल्यामुळे महाराजांच्या उमेदीच्या काळापासून ते महाराजांच्या मृत्यूपर्यंतच्या कालखंडातील महाराजांच्या सर्व मनोवस्था त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या. पहिली पत्नी, दोन मुली आणि चार तरुण मुलांचा झालेला अकाली मृत्यू यासारखे भावनिक आघात, नातेवाईकांचा असणारा नियमित त्रास, केलेले अफाट काम, ब्रिटिश सत्तेशी

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / २०