पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५ वर्षांचा जीवघेणा संघर्ष या सगळ्याचा परिणाम म्हणून बिघडलेले शारीरिक आरोग्य यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेले टोकाचे बदल सरदेसाईंनी अनुभवले होते.
 त्या संदर्भात 'सयाजीराव गायकवाड यांच्या सहवासात' या पुस्तकात सरदेसाई महाराजांचे मनोविश्व कसे बदलत गेले याचे अतिशय बारकाव्याने निरीक्षण नोंदवताना म्हणतात, “ तीस-चाळीस वर्षे सयाजीरावांच्या निकट सहवासांत वागलेले माझ्यासारखे माणूस फार थोडे होते. पहिली त्यांची वृत्ती अत्यंत आनंदी, खेळाडू, आरडाओरडा करून सर्वांशी समरस होण्याची होती. आट्यापाट्या खेळताना मी त्यांचा गोंगाट पाहिला आहे. हसायला लागले की दूरपर्यंत सर्वांना आश्चर्य वाटे की, काय प्रकार आहे. १९०८ साली वडील चिरंजीव फत्तेसिंहराव वारले. पुढे दिल्लीचे प्रकरण गाजले. तेव्हापासून महाराजांचे हसणे- खिदळणे सर्व बंद पडून उत्तरोत्तर ते एकलकोंडे बनत गेले. एकदा दिवाळीत टोपल्या भरून लाडू आणले. त्यांनीच चेंडूसारखी मारामार पाचपन्नास लोकांशी चाललेली मी पाहिली आहे. उसाचे गाडे आले, त्यांजवर महाराजांनी गर्दी करून तोंडानेच ऊस खाण्याचा सपाटा इतरांबरोबर चालविला. असे मनमुराद इतरांशी मिसळलेले मी त्यांना पाहिले आहे. याचे उलट पुढे पुढे ते सर्वथा एकटे एकटे असे राहू लागले की, जेवताना वाढणारा सुद्धा जवळ नसावा. एका टेबलावर भोजन ठेवून नोकराने घंटा वाजवावी व आपण बाजूला जावे. घंटा वाजली तरच आत यावे.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / २१