पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतका त्यांना माणसाचा संसर्ग नकोसा झाला. पाऊणशे ऐशी वर्षांच्या त्यांच्या हयातीची शेवटची पंचवीस-तीस वर्षे ते असे एकटे वागू लागले. काम, वाचन, उद्योग सर्व चालत, पण जवळ दुसरा माणूस नको. मी बडोद्यास असता रात्री दोन वाजता माझ्या दारात मोटार आली की महाराज बोलावतात. शहराबाहेर पाच मैल मकरपुरा येथे ते राहत होते. मी गेलो. दाराशी ए. डी. सी. बसले होते. ते म्हणाले, “वर जा, महाराज तुम्हास बोलावतात. मला तुमच्याबरोबर जाण्याचा हुकूम नाही." मी त्यांचा माग काढ जवळ गेलों. पाहाताच मला म्हणाले, 'झोप येईना म्हणून काही गप्पा मारण्यासाठी तुम्हास बोलावले.' तास दीड तास काही तरी वाचून बोलून झाल्यावर त्यांनी मला रजा दिली. पहिली तीस व शेवटची तीस इतक्या वर्षांतला त्यांच्या वृत्तींतील एवढा पालट सहसा इतरत्र आढळत नाहीं."
सयाजीरावांचे द्रष्टे मूल्यमापन
 सयाजीराव आणि सरदेसाई यांचा ऋणानुबंध विचारात घेता सयाजीरावांच्या भारतीय इतिहासातील स्थानाविषयी सरदेसाईंसारख्या इतिहासकाराचे मत महत्त्वाचे ठरते. सरदेसाई भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि प्रबोधन चळवळ या दोन्ही चळवळींचे पितामह सयाजीराव कसे आहेत हे स्पष्ट करताना म्हणतात, “सयाजीराव महाराज एक अलौकिक व्यक्ती भारतभूमीला भूषण आणणारी निर्माण झाली हे लौकिकात आता फार थोड्यांना माहीत आहे. इंग्रजी अमदानीच्या शंभर

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / २२