पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणूनच सयाजीराव बारा वर्षांचे असता अकल्पित कारणांनी बडोदानरेश बनले. खेडवळ जीवनातून नियतीने त्यांना उचलून एकदम भाग्याच्या परमोच्च शिखरावर आणून बसविले आणि पुढील साठ वर्षांच्या दीर्घ कारभारांत त्यांनी आपले सर्वांगीण कर्तृत्व प्रकट करून जागतिक कीर्ती मिळविली. शिवाजीचा अवतार निराळ्या प्रकारचा झाला. तशाच प्रकारचा भिन्न मार्ग हुडकण्याचे भाग्य सयाजीरावांस लाभले.' रियासतकारांसारख्या मराठ्यांच्या 'आद्य' इतिहासकाराने सयाजीरावांची तुलना थेट शिवरायांशी करणे ही बाब सयाजीराव हे शिवरायांचे 'खरे' वैचारिक वारसदार असल्याची साक्ष देणारी आहे.
 सयाजीरावांनी भारताला गुलाम करणाऱ्या महाबलाढ्य ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देण्याचे धैर्य दाखवले. सयाजीरावांच्या सामाजिक सुधारणा ब्रिटिश राज्यकर्त्यांना सहन होत नव्हत्या. स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांना सयाजीराव पाठबळ दे असतानाही सयाजीरावांना राजद्रोही ठरवण्याइतपत पुरावे ते मागे ठेवत नसल्यामुळे जगावर राज्य करणाऱ्या महाशक्तीचा अहंकार दुखावत होता. परिणामी ज्याप्रमाणे मोगल सैनिकांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसत होते त्याप्रमाणे ब्रिटिश साम्राज्यरुपी घोड्याला सयाजीराव छळत होते.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / २४