पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
रियासतकार सरदेसाई



 महाराजा सयाजीराव यांनी १८८९ ला राज्यकारभार हाती घेतल्यापासून पुढे ५८ वर्षांच्या कारकीर्दीत जे अफाट काम उभे केले त्याला आधुनिक भारताच्या इतिहासात तोड नाही. धर्मसुधारणेपासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत ब्रिटिश भारतातील सार्वजनिक जीवनातील असे एकही क्षेत्र नव्हते जिथे महाराजांचा वावर नव्हता. महत्त्वाचे म्हणजे हा वावर अत्यंत रचनात्मक आणि प्रागतिकसुद्धा होता. अविश्वसनीय स्वरूपाचे हे यश महाराजांनी स्वत: आंतरराष्ट्रीय विद्याव्यासंग, विश्वपर्यटन, वैयक्तिक आणि राजकीय जीवनात ज्ञानाला सर्वाधिक प्रतिष्ठा देण्याची भूमिका, आपल्या राज्यालाच नव्हे तर राष्ट्राला जगातील प्रगत देशांच्या रांगेत वरच्या स्थानावर प्रस्थापित करण्याचा ध्यास याचा परिपाक होता.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / ६