पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिले पुस्तक
 त्यातूनच सरदेसाईंच्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्याचा मार्ग सयाजीरावांनी कसा शोधून काढला हे सरदेसाईंच्या शब्दात सांगायचे झाल्यास,“... बाकीचा माझा वेळ रिकामा जातो हे तत्काळ महाराजांच्या नजरेस आले. मॅकिआव्हेलीचे 'प्रिन्स' व सीलीचे 'एक्स्पॅन्शन ऑफ् इंग्लंड' ही पुस्तके त्यांनी वाचली मराठीत त्या वेळी या नवीन पाश्चात्य विचारांची पुस्तके नव्हती हे जाणून त्यांनी मला त्या पुस्तकांचे मराठी भाषांतर करण्याचे काम दिले.” सरदेसाईंनी हे काम केले तेव्हा ते या क्षेत्रात पूर्णपणे नवखे होते.
 परंतु महाराजांनी दिलेले काम म्हणजे करावेच लागेल अशी परिस्थिती असल्याने पहिल्या वर्षी 'प्रिन्स' चे भाषांतर 'राजधर्म', पुढील दोन वर्षात सीलीच्या 'एक्स्पॅन्शन ऑफ इंग्लंड'चे 'इंग्लंड देशाचा विस्तार' अशी दोन पुस्तके महाराजांच्या खर्चाने प्रकाशित झाली आणि 'इतिहासकार' सरदेसाईंचा उदय झाला. पुढे महाराजांबरोबर अमेरिकेत गेले असता सीली या मूळ लेखकाला भेटण्याची संधी त्यांना मिळाली. त्यासंदर्भात सरदेसाई म्हणतात, "सीलीचे पुस्तक मी त्या प्रोफेसरांस केंब्रिज येथे स्वतः भेटून नजर केलें. याला मी नशीब म्हणतो." सरदेसाईंच्या जीवनातील सयाजीराव नावाचा 'टर्निंग पॉइंट' किती महत्त्वाचा होता हे या घटनेवरून लक्षात येते. याच कालखंडात सरदेसाईचे वास्तव्य राजवाड्यात असल्यामुळे महाराजांचे प्रचंड मोठे खासगी

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / ९