पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेणे तसेच या फंडाची धोरणे लोकांना समजून सांगणे ही या अधिकाऱ्याची जबाबदारी होती. अशा पद्धतीने जमा झालेली माहिती दशवार्षिक कार्यक्रम तयार करण्यासाठी उपयुक्त होती. प्रत्येक खेड्यातील कार्यरत असणारी ग्रामस्थांची समिती या फंडाकडून होणाऱ्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम करत होती.
VI) उत्पन्न आणि खर्च
 या फंडाचे मुख्य उत्पन्न म्हणजे महाराजांनी राखून 'ठेवलेल्या एक कोटी रुपयांवरील व्याज होय. १९३७-३८ ही रक्कम ३ लाख ५० हजार इतकी होती. त्याअगोदरच्या वर्षातील शिल्लक ३ लाख ४२ हजार ४८३ रु. इतकी होती. त्यामध्ये पंचायती आणि लोकवर्गणी यातून ६७ हजार १२६ रु. भर पडली. त्यामुळे एकूण शिल्लक रक्कम ७ लाख ५९ हजार ६०९ रु. इतकी झाली. त्यापैकी १ लाख २१ हजार ९९० रु.१९३७-३८ मध्ये विकास कामासाठी खर्च झाले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १८ कोटी ५९ लाख ३२ हजार इतकी भरते. यावरून या फंडाच्या रचनात्मक कामाची कल्पना येते.
VII) उपक्रमांचे स्वरूप
 या फंडाच्या उपक्रमांचे वर्गीकरण तीन प्रकारात करण्यात आले.
 अ) जन उपयोगाचे उपक्रम - ग्रामीण रस्ते, विहिरी इ. यासाठी बडोदा, मेहसाणा आणि नवसारी या जिल्ह्यांना प्रत्येकी ६० हजार रु. देण्यात आले. तर अमरेली जिल्ह्याला ४५ हजार रु. आणि ओखामंडल जिल्ह्यासाठी १५ हजार रु. देण्यात आले.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / १५