पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आली. स्थापनावर्षी ६ लाख ५८ हजार ९८६ रु. इतका निधी लोकसहभागातून संकलित झाला. या निधीसाठीच्या कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष बडोदा संस्थानचे दिवाण होते. या समितीत संस्थानातील १ अधिकारी व ३९ सर्वसाधारण सदस्य होते. समितीने खेड्यांच्या मदतीसाठीचा दशवार्षिक कार्यक्रम तयार केला. त्यासाठी लोकसंख्येच्या निकषावर दहा विभागात संस्थानातील खेड्यांचे वर्गीकरण करण्यात आले. रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी, विहिरी इ. साठी हा निधी ग्रामपंचायतींना देण्यात येत होता.

 सयाजीरावांच्या राज्यकारभाराच्या हीरकमहोत्सवानिमित्त अस्पृश्य, आदिवासी आणि ग्रामीण विकासाचा वरील नमुना अमलात आला. समकालीन भारतात या प्रयोगाशी तुलना करता येईल असा दुसरा प्रयोग सापडत नाही. पुढे २ ऑक्टोबर १९५० रोजी भारत सरकारने राबवलेला 'समुदाय विकास कार्यक्रम' वरील ट्रस्टच्या उपक्रमांचा पाठलाग करताना दिसतो.

कृषी संशोधनाचा 'आदर्श' नमुना

 २० फेब्रुवारी १९१४ रोजी बडोद्यातील सहकारी मंडळांच्या पहिल्या परिषदेत बोलताना सयाजीरावांनी परदेशातील कृषीविषयक नवीन संशोधनाच्या भारतातील उपयोगाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “शेती हा आपल्या राज्यातील मुख्य धंदा आहे. शेकडा ५५ हून अधिक लोक आज शेतीवर निर्वाह करीत आहेत. असे असूनही

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / १८