पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतीची स्थिती मोठीशी समाधानकारक नाही. शेतीसंबंधी जे नवेनवे शोध जर्मनी, अमेरिका वगैरे देशांत लागत आहेत व विशेषत: ब्रिटिश हिंदुस्थानात ज्या शोधांसाठी सरकारने प्रयत्न करून यश मिळविले आहे, त्या शोधाचा लाभ आपल्याला घेता येण्यासारखा आहे." आपल्या जनतेला जगातील सर्वोत्तम सुविधा पुरवण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या सयाजीरावांनी बडोद्यात केलेले विविध कृषीविषयक प्रयोग त्यांच्या या भूमिकेचाच परिपाक होता.

 शेतीच्या विकासासाठी सयाजीरावांनी शेतजमिनीच्या मातीची गुणवत्ता, मातीचे प्रकार यासंदर्भातील विविध वैज्ञानिक सर्वेक्षणे करून घेतली. कृषी उत्पादनवाढीसाठी महाराजांनी सातत्याने नवनवीन प्रयोग केले. या प्रयोगांना सैद्धांतिक ज्ञानाची जोड देण्यासाठी कृषी रसायनशास्त्र या नवीन ज्ञानशाखेची मदत सयाजीरावांनी घेतली. त्यामुळेच Agricultural Chemistry (कृषी रसायनशास्त्र) विषयाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी होतकरू विद्यार्थ्यांना परदेशात पाठवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सयाजीरावांनी केले. अलीकडच्या काळात भारतात बीटापासून साखर तयार करण्यासाठी विविध प्रयोग केले जात असल्याचे आपण पाहतो. सयाजीरावांनी १०० वर्षापूर्वी बीटापासून साखर तयार करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दर्जेदार बीट उत्पादनासाठी कृषी रसायनशास्त्राचा आधार घेण्याचा सल्ला दिला होता. आज आधुनिक उत्पादन पद्धतीच्या वापराबाबत

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / १९