पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतंत्र कृषी खात्याची स्थापना केली. या कृषी खात्याच्या माध्यमातून कृषिविषयक ज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतानाच सयाजीरावांनी आपल्या संस्थानात शेतीविषयक विविध सुधारणादेखील घडवून आणल्या. संस्थानातील विविध देवस्थाने आणि प्रार्थनास्थळांच्या ताब्यात असणाऱ्या जमिनींना ‘बारखळी जमीन' असे संबोधले जाई. या जमिनीच्या वापराबाबत कोणत्याही प्रकारचा कर आकारण्यात येत नसे. सयाजीरावांनी या जमिनीचे वर्गीकरण करून शेतीशिवाय इतर कारणांसाठी जमिनीचा उपयोग करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना कर आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे संस्थानाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. भंगी समाजातील व्यक्तींना त्यांच्या कामासाठी सरकारकडून देण्यात आलेल्या जमिनींना चाकरीयात जमिनी असे संबोधले जाई. सरकारची मालकी असणाऱ्या या जमिनीतील उत्पादन भंगी समाजातील व्यक्तींना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून दिले जाई. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेनंतर सरकारी कर्मचारी असणाऱ्या भंगी व्यक्तींना नियमित वेतन मिळू लागले. त्यामुळे एकाच कामाचा दुप्पट मोबदला देण्याचा प्रकार घडू लागला. यावर उपाय म्हणून रामचंद्रराव माने-पाटलांच्या सूचनेनुसार सयाजीरावांनी भंगी समाजाच्या ताब्यातील चाकरीयात जमिनी काढून घेतल्या. शासकीय खर्चात योग्य काटकसर करत बारखळी जमिनीसारख्या धार्मिक उधळपट्टीला चाप

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २१