पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २) एकनकडी व फरतानकडी या खेड्यातील दुष्काळामुळे रोजगार गमावलेल्या नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी एक लाख रुपये रकमेची तगाई देण्याचा आदेश.

 ३) तांब्याची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या विसनगरमधील बेरोजगार तांबट कारागिरांना देण्यात येणारी तगाईमधील २००० रु. ची रक्कम आगाऊ देण्याचे आदेश.

 ४) महसुलातील वरिष्ठ अधिकारी व वहिवाटदारांना खेडीपाडी पिंजून काढून निराधार व्यक्तींना मदत करण्याची सूचना महाराजांनी केली. निराधार व्यक्तींना मदत करण्यासाठी सुभा व वहिवाटदारांना अनुक्रमे १०० व ५० रु. निधी मंजूर करण्याचा अधिकार देण्याचा आदेश. आधीचा निधी संपल्यानंतर नवीन निधी देण्याची तरतूद.

 ५) पाटणच्या गंगाडी तलावाच्या कामावरील शारीरिकदृष्ट्या सशक्त आणि कमजोर अशा दोन्ही प्रकारच्या मजुरांकडून कोणतीही जबाबदारी निश्चित न करता काम करून घेतले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर या मजुरांची काम करण्यास सक्षम व काम करण्याच्या स्थितीत नसलेले मजूर अशा दोन गटांत वर्गीकरण करण्याचा आदेश.

 ६) यातील काम करण्यास सक्षम कामगारांवरील कामाची जबाबदारी निश्चित करून मोबदल्याच्या प्रमाणात त्यांच्याकडून नीट काम करून घेण्याचे आदेश.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २४