पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३०) महिना १२ रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्या नागरी आणि लष्करी सेवेतील कर्मचाऱ्यांना टंचाई भत्ता देण्याचा आदेश. लष्करी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून गणवेश, इतर सरंजाम आणि घोडे यासाठी होणाऱ्या नियमित कपातीला स्थगिती देण्याचा आदेश. पुढे गावपातळीवरील सेवकांच्या मागणीनुसार त्यांनादेखील टंचाईभत्त्याचा लाभ देण्यात आला.
  ३१) पद्रा येथील शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच्या विनंतीवरून पद्रा जिल्ह्यासाठी १५,००० रु. निधी मंजूर केल्याचा आदेश.

 ३२) आत्मसन्मानाच्या अतिशयोक्त कल्पनांमुळे दुष्काळी कामांवर न येणाऱ्या पेटलाड जिल्ह्यातील पाटीदार समाजाला मदत स्वरूपात काही अटींवर तगाईची रक्कम आगाऊ देण्याचा आदेश.

 ३३) विश्वासू अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार पेटलाड रेल्वेमार्गाच्या कामावरील धेड समाजातील कामगारांचे वेतन वाढवण्याचा आणि दुर्बल व विकलांगांसाठी दुसरे छोटे काम सुरू करण्याचा आदेश.

 ३४) पेटलाड येथे नागरिकांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे शहरात ताबडतोब गरीबखाना सुरू करण्याचा आदेश. नागरिकांनी मागणी न करताच गरीबखाना आणि अन्नछत्रांसाठी १ हजारपेक्षा अधिक रु. ची रक्कम खानगी खात्यातून मंजूर केली.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २९