पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषेतील माहितीपत्रक प्रदर्शनाआधी प्रसिद्ध करण्यात आले. हे माहितीपत्रक संस्थानातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील सर्व उत्पादक, कृषी व उद्योग संस्थांपर्यंत पोचवण्यात आले. सर्व भारतीयांना खुले असणारे हे प्रदर्शन पूर्णपणे मोफत होते. प्रदर्शनातील कोणत्याही स्टॉलसाठी सरकारने कर किंवा इतर शुल्क आकारले नाही. केवळ ज्या स्टॉलसाठी काही विशेष सोयी-सुविधा आवश्यक असतील त्यांनाच माफक शुल्क आकारण्यात आले. या प्रदर्शनामध्ये एकूण २९,३१८ व्यक्तींनी सहभाग नोंदवला. कृषी प्रदर्शनांच्या आयोजनाचा हा 'सयाजी पॅटर्न' आजही आपल्यासाठी आदर्शवत आहे.

शेती - सहकार समन्वयाचे 'पथदर्शक प्रारूप '

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राने प्रयत्नपूर्वक 'सहकार चळवळीची पंढरी' म्हणून नावलौकिक कमावला. त्याच्या सुमारे ५० वर्षे आधी सयाजीरावांनी बडोद्यात सहकार चळवळीच्या माध्यमातून कृषी विकासाचे 'मॉडेल' प्रत्यक्षात राबवले होते. १८८४ मध्ये सयाजीरावांनी बडोदा संस्थानातील गणदेवी येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना शासन व शेतकऱ्यांच्या संयुक्त भांडवलावर सुरू केला. या कारखान्यात ५० टक्के भांडवल बडोदा संस्थानचे तर ५०टक्के भांडवल शेतकऱ्यांचे होते. दुर्दैवाने 'सहकार चळवळीच्या पंढरी'त हा इतिहास आजवर दुर्लक्षित राहिला.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ३३