पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बडोद्यात सहकार चळवळीच्या उभारणीमागील सयाजीरावांची भूमिका समजून घेण्यासाठी १९९४ मध्ये बडोदा येथील सहकारी मंडळ्यांच्या परिषदेत महाराजांनी अधिकारी वर्गाला उद्देशून केलेले भाषण उपयोगी पडते. या भाषण महाराज म्हणतात, “जर्मनी वगैरे देशांत सहकारी चळवळ म्हणजे एक यक्षिणीची कांडी ठरून गेली आहे व तिने शेतकरीवर्गाची स्थिती कमालीची सुधारून टाकली आहे. गुणराशिनाशी असा जो दारिद्र्यदोष त्याची त्या देशातून हकालपट्टी झाली असून ज्या जागी आता सुख-समृद्धी नांदत आहे. शेतकरीवर्ग असा संतुष्ट झाल्यामुळे राष्ट्रीय सुबत्तेचा पायाच भक्कम झाला आहे. " जागतिक परिप्रेक्ष्याशी तुलना करत सयाजीरावांनी बडोद्यातील सहकार चळवळीचा पाया घातला.

 कृषी उत्पादन वाढीसाठी शेतीला वेळेवर पाणीपुरवठा करणे गरजेचे असते. शेतीची ही गरज ओळखून सयाजीरावांनी शेतीस वेळेत व खंड न पडता पाणीपुरवठा व्हावा यासाठी १९२९ मध्ये सहकारी पॉवर पंप संस्थांची स्थापना केली. या पॉवर पंप संस्थांनी सभासदांबरोबरच इतर खेडूतांना पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला. याचबरोबर शेतीला शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी सयाजीरावांनी बडोद्यात विहिरींच्या बांधकामाला विशेष प्रोत्साहन दिले. त्यामुळेच १९३९-४० मध्ये बडोदा संस्था ७१,११५ पक्क्या व १७,०१८ कच्च्या विहिरी अस्तित्वात होत्या. तसेच १९३० पासून जिल्हा स्थानिक मंडळ व कृषी विकास समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुधारित अवजारांचा पुरवठा केला गेला.

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ३४