पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्ष वाढवून दिली. त्यामुळे केतकर १९०६ ते १९१० अशी ४ वर्ष शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकले. सयाजीरावांनी श्रीधर व्यंकटेश केतकर यांना दिलेली शिष्यवृत्ती ही जातीवरच्या संशोधनासाठीची पहिली शिष्यवृत्ती आहे. घरच्यांचा विरोध पत्करून अमेरिकेला गेलेले केतकर सयाजीरावांच्या शिष्यवृत्तीमुळेच 'द हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया' हा आपला पीएच. डी. प्रबंध कोर्नेल विद्यापीठाला सादर करू शकले. केतकरांनी सादर केलेल्या या प्रबंधाला १९११ मध्ये कोर्नेल विद्यापीठाने पीएच. डी. ही सर्वोच्च पदवी प्रदान केली. संपूर्ण जगातील जातीवरचा हा पहिला संशोधनात्मक प्रबंध होता. याच नावाने हा प्रबंध १९०९ मध्ये प्रकाशित झाला. त्या काळात अमेरिकेत प्रबंध प्रकाशित झाल्यानंतरच पदवी दिली जात होती. या प्रबंधात मनुस्मृतीचा काल निश्चित केला असून मनुस्मृतिकालीन समाजस्थितीचे विशेषतः जातिसंस्थेचे स्वरूप उलगडून दाखविले आहे. जातिभेद व वंशभेद एकरूप नसून भिन्न आहेत, हा विचारही यात मांडला आहे. केतकरांचा हा प्रबंध जगभर गाजला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी अमेरिकेतील त्यांच्या मार्गदर्शकांबरोबरच प्रबंधाचे टंकलेखक आणि प्रूफरीडर या व्यक्तींचेदेखील कृतज्ञतापूर्वक आभार मानले. परंतु ज्यांच्या शिष्यवृत्तीमुळे केतकर हे जगप्रसिद्ध संशोधन करू शकले त्या सयाजीरावांचा साधा उल्लेखसुद्धा त्यांनी आपल्या प्रस्तावनेत केला नाही. ही बाब केतकरांसारख्या संशोधकाला न शोभणारी होती.

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / १३