पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्षमाशील राजाचे दर्शन
 बडोदा संस्थानच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठरावीक वर्षे बडोद्यात नोकरी करणे बंधनकारक असे. या नियमानुसार अमेरिकेतून परतल्यानंतर केतकरांना सयाजीरावांनी बडोदा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी देऊ केली होती. परंतु ही नोकरी त्यांनी नाकारली. यासंदर्भात केतकरांचे चरित्रकार द.ना. गोखले म्हणतात, “राष्ट्रगुरुची भूमिका वटविण्याच्या मनोदयामुळे त्यांनी बडोदे संस्थानची नोकरी पत्करली नाही. सयाजीराव महाराजांनी अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिलेली असल्यामुळे शिक्षण संपल्यावर बडोदे संस्थानात नोकरी करण्याचे बंधन त्यांच्यावर होते. पण इंग्रजी भाषेत प्राध्यापकी करण्यास आपण नाखुश आहोत, या सबबीबर त्या बंधनातून सयाजीरावांकडून स्वत:ला त्यांनी सोडवून घेतले.”

 तर १९४६ मध्ये केतकरांचे चरित्र लिहिणारे दाते आणि कर्वे यासंदर्भात म्हणतात, '... आपण मराठी भाषेतच काही कार्य करावयाचे योजिले असून तशी सोय, म्हणजे विश्वविद्यालय इत्यादी जर बडोद्यात होणार असेल तर आपण तेथे सेवा करण्यास येऊ' असे डॉ. केतकर यांनी श्रीमंत सयाजीराव महाराजांना कळविले होते. मात्र केतकरांच्या अपेक्षेप्रमाणे बडोद्यात तसे विद्यापीठ नसल्यामुळे किंवा काही अन्य कारणामुळे केतकरांना शिष्यवृत्तीच्या अटीनुसार बडोद्यात नोकरी करण्यात सयाजीरावांकडून सूट देण्यात आली.

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / १४