पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेथे काहीतरी निमित्त होऊन सयाजीरावांचे नि त्यांचे संबंध बिघडले व त्यांची फारशी व्याख्याने न होता त्यांना दहापंधरा दिवस तेथे लोंबकळत राहावे लागले. सयाजीरावांनी या भेटीत बडोदा विद्यापीठाच्या स्थापनेबद्दल त्यांचा सल्ला घेतला, असे काही लोक सांगतात. काय नक्की झाले कोणास ठाऊक, पण पुण्याला परतल्यावर केतकरांनी सयाजीरावांना अशी एक नोंदलेली नोटीस पाठविली, की 'तुम्ही रोज पन्नास रुपयांप्रमाणे पंधरा दिवसांची 'कन्सल्टेशन फी' पाठवून द्यावी, नाहीतर तुमच्यावर फिर्याद करावी लागेल ! खरे म्हणजे, सयाजीरावांनी मोठ्या उदारपणाने शिक्षणासाठी अमेरिकेत त्यांना मदत केली होती व ते हिंदुस्थानात आल्यावर बडोदे संस्थानात नोकरी करण्याची त्यांच्यावरील अट काढून टाकली होती. तेव्हा या प्रसंगी काहीही घडलेले असले तरी त्यांनी सयाजीरावांना फिर्यादीची धमकी देणे अत्यंत अनुचित होते. पण केवळ फिर्यादीचे वेड डोक्यात असल्यामुळे त्यांना औचित्याचे भान राहिले नाही. पुढे सयाजीरावांनी त्यांच्या नोटिशीकडे लक्ष दिले नाही.”

 या सर्व प्रकरणाकडे महाराजांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. पुढे २७ ते ३० डिसेंबर १९३३ दरम्यान सयाजीरावांनी बडोद्यात अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे आयोजन केले. या परिषदेच्या २९ डिसेंबरच्या मराठी भाषा सत्राच्या अध्यक्षपदी डॉ. केतकरांची निवड करण्यात आली. या परिषदेच्या भाषणात

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / १८