पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खोडून काढले. अखेर स्वामींनी आपला पराभव मान्य करत सयाजीरावांची माफी मागितली. सयाजीरावांचे धर्मविषयक अचूक आकलन स्पष्ट करण्यास ही बाब पुरेशी ठरते. यातून महाराजांच्या धर्मचिकित्सेवरील अधिकाराची प्रचिती येते.
महाराजा सयाजीराव आणि वि. रा. शिंदे

 १९०७ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यातील न्यायमंदिरात विठ्ठल रामजी शिंदेंचे 'अस्पृश्योद्धार' या विषयावरील भाषण आयोजित केले होते. ते भाषण 'बहिष्कृत भारत' या मथळ्याखाली 'मनोरंजन' मासिकाच्या डिसेंबर १९०८ च्या अंकात प्रकाशित झाले. पुढे महाराजांच्या आज्ञेने हेच व्याख्यान 'बहिष्कृत भारत' या स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. २० वर्षांनंतर १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' याच नावाचे पाक्षिक सुरू केले. विठ्ठल रामजी शिंदेंच्या 'बहिष्कृत भारत' या पुस्तिकेच्या एक हजार प्रती महाराजांनी विकत घेऊन बडोद्यात वाटल्या. हा विठ्ठल रामजी शिंदेचा या विषयावरील पहिला मराठी निबंध होता. हा निबंध म्हणजे पुढे शिंदेंच्या 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' (१९३३) या प्रश्नाची समाजशास्त्रीय चर्चा करणाऱ्या मराठीतील पहिल्या ग्रंथाचा पाया होता. विठ्ठल रामजी शिंदेंनी हा ग्रंथ सयाजीरावांना अर्पण केला होता. दुर्दैवाने महाराजांच्या अन्य कार्याप्रमाणे हा इतिहाससुद्धा डॉ. रा. शं. वाळिंबेंच्या भाषेत ' जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष' या सदरात टाकला गेला असावा अशी शंका येते.

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / ९