पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांची सनातन वैदिक धर्मावरील दहा व्याख्याने सनातन मंडळींनी बडोद्यामध्ये आयोजित केली होती. महाराजांच्या कानावर या व्याख्यानांच्या कौतुकपूर्ण चर्चा येऊ लागल्या. परंपरावादी हिंदू धर्माचा पुरस्कार करणार्या या व्याख्यानांचे आयोजन महाराजांनी राजवाड्यात केले.
 .स्वामी हंसस्वरूपांचा टोकाचा हिंदू धर्म अभिमान विज्ञानवादी महाराजांना पटला नाही. या व्याख्यान मालिकेनंतर महाराजांनी केलेल्या समारोपाच्या भाषणात या व्याख्यानांवर उत्स्फूर्तपणे आक्षेप नोंदवत प्रतिवाद करणारे दोन तासाचे भाषण करून हंसस्वरूप स्वामींचे सर्व मुद्दे खोडून काढत त्यांना माफी मागण्यास भाग पाडले. माफी मागताना हंसस्वरूप म्हणाले, "महाराज आपल म्हणणं मला मान्य आहे. आपल्याला विरोध करण्याची माझ्यासारख्याची योग्यता नाही." हंसस्वरूप सामान्य आसामी नव्हती. ती संपूर्ण भारतवर्षातील हिंदूधर्माची भाष्यकार होती. यावरून महाराजांची धर्मचिकित्सा आणि त्यासाठी लागणाऱ्या संस्कृत भाषाज्ञानाच्या व्यासंगाचे दर्शन घडते.
संस्कृत संवर्धनामागील वैज्ञानिक भूमिका

 ५ मार्च १९१५ रोजी बडोदा येथे भरलेल्या पहिल्या संस्कृत संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीही महाराज स्वत: हजर होते. दुसऱ्या दिवशी महाराजांनी या संमेलनात भाषण केले. यावरून महाराजांची भाषा, साहित्य, संस्कृती आणि एकूणच ज्ञान व्यवहाराबाबतची आसक्ती प्रतीत होते. यावेळी संमेलनाला

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / २१