पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माध्यमातून प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संवर्धन आणि पुनर्प्रकाशन करणे इतक्या व्यापक स्वरुपात त्यांनी संस्कृत भाषेचे संवर्धन केले. राज्यकारभार हाती घेतल्यानंतरच्या पहिल्या दशकात ते रियासतकार सरदेसाईकडून दोन ते तीन वर्षे संस्कृत शिकले. त्यांच्या या सर्व प्रयत्नामागे संस्कृत भाषेतील ज्ञानभांडार जे ब्राह्मण जातीपुरते मर्यादित होते ते सर्वांसाठी खुले करण्याचा विशाल दृष्टीकोनसुद्धा होता.

 या पार्श्वभूमीवर बडोद्यात मार्च १९१५ रोजी भरलेल्या पहिल्या संस्कृत संमेलनात महाराजांनी केलेले भाषण त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट करते. या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात महाराज म्हणतात, “संस्कृत भाषा ही प्रौढ भाषा असून ती इतर अनेक भाषांची जननी आहे.” याच भाषणात पुढे महाराज म्हणतात, “परंतु संस्कृत वाड्मयाचे मूलस्थान जो हिंदुस्थान देश त्या देशातील लोकांकडून म्हणजे आम्हा हिंदू लोकांकडून संस्कृत वाड्मयाचा अभ्यास वर दर्शविलेल्या दिशेने झाला किंवा होत आहे असे मला वाटत नाही. आपल्या लोकांनी या वाड्मयाकडे जरी दुर्लक्ष केले नसले तरी त्या संबंधी योग्य ते श्रम आपण घे नाहीत असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागते.” महाराजांची ही भूमिका संस्कृत भाषेला आपल्या प्राचीन संस्कृतीला समजून घेण्याचे एक साधन मानते. १०६ वर्षापूर्वी सयाजीरावांनी संस्कृत भाषेबाबत स्वीकारलेला दृष्टीकोण आजही आपल्याला पुनर्विचार करायला लावणारा आहे.

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / ७