पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्म साक्षरतेचा आरंभ आणि संस्कृत भाषा
 १८८१ मध्ये राज्याधिकार प्राप्त झाल्यानंतर महाराजा सयाजीराव यांच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या कार्यक्रमास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १८८४ मध्ये सत्यशोधकी विचाराचे रामचंद्र विठोबा धामणस्कर यांना ब्रिटिश सरकारच्या नोकरीतून बोलावून सयाजीरावांनी बडोद्यात नायब सुभे पदावर नेमले आणि इथूनच बडोद्यातील सत्यशोधकी विचारांना चालना मिळाली. त्यानंतर रामजी संतूजी आवटे या आणखी एका सत्यशोधकी विचारांच्या व्यक्तीने 'बडोदा वत्सल' हे सत्यशोधकी वर्तमानपत्र काढले.

 सत्यशोधकांनी हिंदू धर्म चिकित्सेच्या भूमिकेतून संस्कृत भाषेतील धर्म विधींसंदर्भातील साहित्य मराठीत भाषांतरित करण्याचे प्रयत्न महात्मा फुलेंपासूनच सुरू केले होते. १८९६ च्या दरम्यान आवटे आणि धामणस्कर यांनी मिळून महाराजांच्या आश्रयाने माधवराव पवार यांच्या घरी मराठा जातीचे पुजारी तयार करण्याचे वर्ग सुरू केले. याच वर्षी बडोद्यातील वेदोक्त प्रकरणास सुरुवात झाली. या पाठशाळांमधून धर्म साक्षरतेचे शिक्षण आणि भगवद्गीतेचे ज्ञान दिले जाई. याही पुढे जाऊन महाराजांनी केलेले धर्म साक्षरतेचे कार्य पाहता महाराजांच्या राज्यकारभारात भारताच्या शेकडो वर्षात झाले नाहीत असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेले दिसतात. इतकेच नव्हे तर त्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम महाराजांना त्यांच्या

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / ८