पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांच्या कृतीशीलतेचे अनन्यत्व लक्षात येते. १९१८५ मध्ये गणदेवी येथे संस्थान आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त मालकीचा आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरु करून सयाजीरावांनी भारतात कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घातला. १८९७ मध्ये बडोद्यात स्वतंत्र शेती खाते ' सुरु केले. १८९८ मध्ये 'कृषीकर्मविद्या' हा ६०० पानांचा ग्रंथ प्रकाशित केला. बँक ऑफ बडोदा आणि विविध सहकारी पतपेढ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. शेतीसाठी पाणी, अवजारांबरोबरच कृषिविषयक प्रगत ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. संस्थानाच्या वतीने १२,००० विहिरी खोदल्या. शेतीच्या शाश्वत विकासासाठी ४२ प्रकारच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून 'कृषी सहकारा'चा मानदंड सयाजीरावांनी निर्माण केला. सयाजीरावांचे हे सर्व प्रयत्न म्हणजे फुलेंनी मांडलेल्या शेतकरी कल्याण कार्यक्रमाचा परिपूर्ण विकास आहे.
 अस्पृश्यांसह सर्व जातीच्या लोकांना मोफत संस्कृत शिक्षण, धार्मिक विधी, संस्कृत ग्रंथांचे मराठी अनुवाद, सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाबरोबरच लोकांमध्ये अधिकार आणि कर्तव्यांबाबत साक्षरता निर्माण करणे, पाश्चात्य संस्कृतीचा परिचय करून देणारे ग्रंथ प्रकाशन, ग्रंथालय चळवळ, ग्रंथ व वर्तमानपत्रांचे प्रकाशन आणि व्याख्याने या माध्यमातून सयाजीरावांनी जनजागृतीचे बहुमूल्य कार्य सातत्याने केले. सयाजीरावांचे हे कार्य म्हणजे महात्मा फुलेंना अपेक्षित 'प्रबोधना'चा सकारात्मक विस्तारच आहे.
 सावित्रीबाईंना आर्थिक पाठबळ

 १८९० मध्ये फुलेंच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई आणि यशवंत यांना अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागत होते. मामा परमानंदांच्या विनंतीवरून महाराजांनी सावित्रीबाईंच्या मदतीसाठी धामणस्करांच्या हस्ते एक हजार रूपयांचा चेक पाठवून दिला. मामांचे स्नेही तुकाराम तात्या भागीदार असणाऱ्या एस. नारायण कंपनीत हा चेक ठेऊन त्या रकमेच्या व्याजातून दर तिमाहीस सावित्रीबाईंना ५० रु. मदत मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. या ठेवीची पावती सावित्रीबाईंकडे ठेवण्याच्या सयाजीरावांच्या हुकूमाप्रमाणे ही पावती रजिस्टर पत्राने सावित्रीबाईंकडे पाठवण्यात आली. यासंदर्भात महादू सहादू वाघोले यांची आठवण महत्वपूर्ण आहे. वाघोले म्हणतात, “तात्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब सावित्रीबाई व मुलगा यशवंता

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / १०