पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीरावांच्या कार्याबद्दल भाऊरावांच्या मनात आदर होता. तो आदर मुख्यत: प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि अस्पृश्यता निर्मूलन या दोन क्षेत्रातील सयाजीरावांच्या क्रांतिकारक यशाबद्दल होता. यासंदर्भात कर्मवीरांवर संशोधन करणारे डॉ. आर. ए. कडियाळ म्हणतात, “ In the case of Maharaja Sayajirao Gaikwad, Bhaurao appreciated his far-sighted democratic administration in his state; his experiment of universal and compulsory free primary education; his attempt at eradication of untouchability;"
 फुले तत्वज्ञानाचे विकासक
 १३ नोव्हेंबर १८८४ मध्ये महात्मा फुलेंनी मुंबई सरकारकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्याची मागणी केली होती. बालविवाह लावणाऱ्या वधु- वरांच्या पालकांकडून दंड वसूल करून तो बहुजनांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची मागणीदेखील त्यांनी यावेळी केली होती. या पत्रात असा कायदा करण्याची दृष्टी फक्त सयाजीरावांकडेच आहे असेही फुलेंनी नमूद केले होते. फुलेंच्या मागणीनंतर अवघ्या दीड वर्षांनी १४ जुलै १८८६ रोजी आपले गुरु सर इलियट यांना लिहिलेल्या पत्रात बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याचा निश्चय सयाजीरावांनी व्यक्त केला. पुढे १९०४ मध्ये महाराजांनी बडोद्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केला. हा कायदा लागू करतानादेखील सयाजीरावांनी फुलेंच्या अपेक्षेच्या पुढे एक पाऊल टाकत वधू-वरांच्या पालकांबरोबरच लग्न लावणाऱ्या भटजीलादेखील दंड आणि शिक्षेची तरतूद केली. पुढे १९३७ मध्ये दंडाची रक्कम ५० रु. वरून १०० रु. झाली. ही दंडाची रक्कम आजच्या रुपयाच्या मूल्यात १ लाख ५७ हजार रु. हून अधिक भरते. फुले हे भारतातील पुरोहितशाहीचे सर्वात 'कडवे' विरोधक होते. असे असूनसुद्धा फुल्यांची झेप वधू-वरांच्या माता-पित्यांपलीकडे गेली नाही. सयाजीराव मात्र लग्न लावणाऱ्या भटजीला जेव्हा कायद्याच्या चौकटीत दंड देण्याची तरतूद करतात.

 महात्मा फुलेंनी हिंदू धर्म चिकित्सा हे आपले जीवनध्येय मानले होते. हिंदू धर्मातील 'पुरोहितशाही'वर प्रहार करतानाच या पुरोहितशाहीला पर्याय देण्याचा प्रयत्न फुलेंनी केला. त्यानुसार १८८७ मध्ये फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / २६