पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दर्शवली होती. परंतु तसे प्रयत्न न झाल्याने तो विषय तेथेच थांबला. पुढे ‘सत्यप्रकाश” हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र प्रकाशित करण्याची योजना समोर आल्यानंतर त्याला मदत करण्याची भूमिका सयाजीरावांनी घेतली होती.
 सयाजीराव महाराज फुलेंचा उल्लेख नेहमी 'महात्मा' असा करीत. १८८८ मध्ये सयाजीरावांच्या सूचनेनुसार मुंबईतील सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी फुलेंना 'महात्मा' ही पदवी अर्पण केली. सयाजीरावांबद्दल वाटणारा आदर फुलेंनी एक अखंड लिहून व्यक्त केला. हा अखंड त्यावेळी 'दीनबंधू'मध्ये प्रकाशित झाला होता. महात्मा फुलेंनी पत्राद्वारे मागणी करून सयाजीरावांचा फोटो हवा असल्याचे कळवले. त्यानुसार महाराजांनी राजवेशातील फोटो त्यांना पाठवला. परंतु त्याऐवजी साध्या वेशातील फोटो मागवून घेवून फुलेंनी आपल्या बैठकीच्या खोलीत लावला होता. त्यावेळी महाराजांचे वय अवघे २५ वर्ष होते तर फुलेंचे वय ६१ वर्ष होते. महात्मा फुल्यांनी सयाजीरावांचा फोटो आपल्या बैठकीच्या खोलीत लावणे यातच पुरोगामी महाराष्ट्राचा 'खरा' इतिहास लपला आहे.
 हा सर्व इतिहास जाणून घेताना होणाऱ्या आनंदापेक्षा होणाऱ्या वेदनाच अधिक आहेत. कारण गेली ६० वर्षे आपण भारतीय समाजक्रांतीचे जनक म्हणून फुले विचारांची चर्चा करत आहोत. सयाजीराव एका अर्थाने महात्मा फुलेंचे समकालीन होते कारण फुलेंच्या आयुष्याच्या शेवटच्या सात वर्षात महात्मा फुले आणि सयाजीराव यांच्यात कृतिशील संवाद होता. त्याच दरम्यान अनेक सत्यशोधक सयाजीरावांच्या संस्थानात कार्यरत होते. त्याचप्रमाणे १९३९ मध्ये सयाजीरावांचा मृत्यू होईपर्यंत सत्यशोधक चळवळीला विविध मार्गांने सयाजीरावांनी पाठबळ दिले होते. असे असूनसुद्धा फुले परंपरेचा कृतिशील वैचारिक विकास करणारे सयाजीराव मात्र सत्यशोधक चळवळीच्या अधिकृत इतिहासात 'अदखलपात्र' ठरले. हा 'अदखलपात्र' इतिहास 'दखलपात्र' करण्याचा संकल्प हीच सत्यशोधक चळवळ गतिमान करण्याची नांदी ठरावी.

●●●
महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / ३१