पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यामध्ये प्रामुख्याने नागरी संस्था, विणकरांसाठी संस्था, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संस्था, चर्मकारांसाठी संस्था, अंत्योज्यांसाठी संस्था, शिक्षक सहकारी संस्था, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी संस्था इ. प्रकारच्या संस्था बडोदा संस्थानात महाराजांनी स्थापन केल्या. १९२२-२३ या वर्षात 'गायकवाड बडोदा राज्य रेल्वे कर्मचारी संस्था' या बिगर कृषी संस्थेची नव्याने स्थापन करण्यात आली. तसेच मुस्लिमांसाठी काम करणारी 'मोहमेडन नागरी सहकारी संस्था' बडोदा शहरात कार्यरत होती.

 १९२९-३० मध्ये सरार पाणीपुरवठा संस्था ग्रामीण भागातील लोकांना, जनावरांना आणि घरगुती वापरासाठी पाणीपुरवठा करीत होती. या संस्थेने ऑईल इंजिन खरेदी करून त्यामार्फत लोकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. १९३१- ३२ या आर्थिक वर्षात बिगर कृषी संस्थांची संख्या १८४ इतकी झाली. यामध्ये १४ शहरी बँका, ५७ पूर निवारण संस्था, १३ नोकरदार संस्था, ४१ विणकरांच्या संस्था, ११ चर्मकार संस्था, ८ काटकसर संस्था, २१ सहकारी भांडारे, १ परस्पर सहकार्य संस्था, ५ गृहनिर्माण संस्था, ६ संस्था अस्पृश्य जातींशी संबंधित व ७ संस्था इतर वर्गाशी संबंधित होत्या.

मध्यवर्ती सहकारी बँका आणि बँकिंग संघटना

 १९१५-१६ मध्ये बडोदा संस्थानात २ नागरी बँका कार्यरत होत्या. या संस्थांपैकी एक संस्था बडोदा येथे तर दुसरी वसो या ठिकाणी होती. बडोदा येथील नागरी बँक छोटे व्यापारी, मोठे

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / १२