पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९३८-३९ या वर्षामध्ये भद्रण, अमरेली, व्यारा व सोनगढ या कृषी बँका उत्तम कामगिरीसह वाटचाल करत होत्या. या सर्व कृषी बँकांमध्ये अमरेली येथील बँकेने या वर्षात शेतकऱ्यांना उच्च प्रतीच्या बी-बियाणांचे वाटप करण्याचे धोरण ठेवले. या धोरणाच्या अनुषंगाने अमरेली बँकेकडून दोन हजार ४३९ म शेंगदाणे, १३२८ मण कापूस बियाणे, १५० मण बाजरी, ११३ मण ज्वारी बियाणांच्या वाटपातून मोठ्या प्रमाणात शेतजमीन क्षेत्र पिकाखाली आले. अमरेलीसारख्या भागात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्रीसाठी एखादी बाजारपेठ असावी या उद्देशाने सयाजीरावांच्या निर्देशावरून अमरेली कृषी बँकेला अमरेली शेतमाल बाजारपेठ निर्माण करण्यासाठी प्रमाणित केले.

भू-तारण बँक

 स्वावलंबन, परस्पर साहाय्य आणि काटकसर या तत्त्वांना व्यवहारात आणणारी किंवा जनसामान्यांची आर्थिक, नैतिक, सामाजिक आणि राजकीय अशी विविध प्रकारची प्रगती साध्य करणारी बडोदा सहकारी भू-तारण बँक बडोदा येथे १९३३ मध्ये स्थापन करण्यात आली. स्थापना झाल्यानंतर लगेचच या बँकेने आपले कार्यक्षेत्र वाढवण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात १९३५-३६ मध्ये या बँकेचे कार्यक्षेत्र सिन्नर, वाघोडिया आणि कर्जत इ. तालुक्यांपर्यंत वाढविण्यात आले.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / १७