पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९३८-३९ मध्ये बडोदा जिल्ह्यातील दाभोई, कर्जत, सिन्नर, वाघोडिया, पाद्रा व सोनखेडा या तालुक्यांना भू-तारण बँकेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे धोरण सरकारने अवलंबिले होते. या वर्षी भू-तारण बँकेचे एकूण भांडवल १,११,०२३ रु. इतके झाले.

सहकारी संस्थांचे वर्गीकरण

 सहकारी संस्थांच्या होणाऱ्या गुणात्मक वाढीवरून त्या संस्थांच्या वर्गीकरणाचे धोरण सयाजीरावांनी १९२८ साली स्वीकारले. हे वर्गीकरण करत असताना 'अ', 'ब', 'क', 'ड' आणि 'इ' यातून सहकारी संस्थांमध्ये वर्षागणिक होणारा विकास समजत होता. असे वर्गीकरण केल्याने सर्वच संस्थांची स्थिती समजते. १९२८-२९ साली बडोदा संस्थानात ८३५ सहकारी संस्थांपैकी 'अ' आणि 'ब' वर्ग संस्थांची संख्या २४० होती. 'क' वर्ग संस्थांची संख्या ४८३ तर 'ड' आणि 'इ' वर्ग संस्थेची संख्या ११२ होती. कोणतीही संस्था केवळ नोंदणीकृत आहे म्हणून ती संस्था अनिश्चित काळासाठी सुरू ठेवण्यात येत नव्हती. वेळोवेळी प्रत्येक संस्थेची प्रगती बघून तिच्या नोंदणीसंदर्भात निर्णय घेतला जात होता. बडोद्यातील सहकार खात्याचे हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानता येईल.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / १८