पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सृजनशील बडोदा सहकार

 सहकारी संस्थांचे विकेंद्रीकरण करताना महाराजांनी इतर संस्थानांच्या तुलनेत समाजातील प्रत्येक घटक सहकार चळवळीत कशाप्रकारे सामील होईल याचा बारकाईने विचार केला. त्यामुळेच सयाजीरावांना सहकारातील अनेक नावीन्यपूर्ण संस्थांची निर्मिती करता आली. विविध प्रकारच्या बहुतांश सहकारी संस्था सर्वप्रथम बडोदा संस्थानातच सुरू करण्यात आल्या असाव्यात. १९२७ साली बडोदा संस्थानात आलेल्या महापुरावेळी जनतेची प्रचंड वित्त हानी झाली होती. हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून महाराजांनी अशा पूर आपत्तीच्या वेळी बडोदा संस्थानातील प्रजेला सर्वांगीण मदत करण्यासाठी पूर निवारण संस्था सुरू केली. समाजातील मूलभूत प्रश्नांना सामोऱ्या जाणाऱ्या पुढील नमुनेदार संस्था म्हणजे सयाजीरावांच्या सृजनशील विचारांची समाजशिल्पेच आहेत.

१) अन्योन्य सहकारी मंडळी

 १९०४ मध्ये ब्रिटिश भारतात सहकार कायदा अमलात येण्यापूर्वी १५ वर्षे अगोदर १८८९ साली बडोद्यात प्रा. विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी 'अन्योन्य सहकारी मंडळी' ही संस्था स्थापन केली होती. प्रा. कवठेकर हे बडोद्यातील व्हर्नाक्युलर कॉलेज ऑफ सायन्स या पाठशाळेत शिकवत असत. त्यांनी १८९७ मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्त्वे मराठीत मांडण्याचा पहिला प्रयत्न 'अर्थशास्त्र' या ग्रंथाद्वारे केला.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / १९