पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६) विखुरलेल्या शेतजमिनीचे एकत्रीकरण संस्था

 प्रत्येक पिढीगणिक शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचे विभाजन होऊन त्यांच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ कालपरत्वे कमी झाले होते. परिणामी म्हणून शेतीतून मिळणारे उत्पादनदेखील घटले होते. त्यामुळे शेतजमिनीचे उत्पादन वाढवण्यासाठी विभाजनामुळे विखुरलेल्या जमिनीचे एकत्रीकरण करणे आवश्यक होते. म्हणून शेतीच्या एकत्रीकरणातून उत्पादकता वाढवून त्याचा शेतकऱ्याला फायदा व्हावा या हेतूने एप्रिल डिसेंबर १९२७ मध्ये पाच विखुरलेल्या शेतजमिनीचे एकत्रीकरण करणाऱ्या संस्थांची निर्मिती सयाजीरावांनी केली.

 १९३६-३७ मध्ये एकूण अशा ७४ संस्थांची नोंद झाली. या संस्थांच्या माध्यमातून या वर्षी ३८ सभासदांच्या ९८९.१२ बिघे जमिनीचे एकत्रीकरण करण्यात आले. या शेतजमीन एकत्रीकरणामुळे शेती करण्यास शेतकऱ्यांना सोयीस्कररीत्या हवे ते उत्पादन घेता येऊ लागले. १९३८-३९ अखेर बडोद्यात ७७ संस्थांची स्थापना केली गेली.

७) पॉवर पंप संस्था

 शेतीस वेळेत व खंड न पडता पाणीपुरवठा व्हावा यासाठी १९२९ साली पॉवर पंप संस्थांची निर्मिती केली गेली. १९२९-३० मध्ये भुरकोई पॉवर पंप संस्थेने आपल्या सभासदांबरोबर इतर खातेदारांनादेखील या माध्यमातून पाणीपुरवठा केला. भुरकोई

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / २३