पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क) विद्यार्थी भांडारे

 विद्यार्थ्यांमध्ये सहकार चळवळीचे महत्त्व रुजावे या हेतूने १९३१ मध्ये सयाजीरावांनी सहकारी तत्त्वावरील विद्यार्थी भांडारांची निर्मिती केली. १९३१-३२ मध्ये बडोद्यात सुरू झालेल्या सहकारी तत्त्वावरील नोंदणीकृत विद्यार्थी भांडारांचे एकूण ७१६ विद्यार्थी सभासद होते. तर या वर्षी बडोद्यातील सहकार खात्याकडे नोंदणी नसणाऱ्या अनोंदणीकृत १९४ विद्यार्थी भांडारांची सभासद संख्या ६,०५३ इतकी होती. १९३७- ३८ मध्ये २१ विद्यार्थी भांडारांनी ५,०६७ रुपये किमतीच्या वस्तूंची विक्री केली.

 बडोद्यातील विद्यार्थी सहकारी भांडारांच्या वाटचालीचा विचार करता विद्यार्थ्यांनी चालवलेल्या या सहकारी संस्थांची संथगतीने परंतु सातत्यपूर्ण प्रगती झाल्याचे दिसते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सहकार चळवळीची मूल्ये रुजवण्याचा सयाजीरावांचा उद्देश या विद्यार्थी सहकारी भांडारांनी लक्षणीय प्रमाणात साध्य केला.

९) सहकारी गृहनिर्माण संस्था

 बडोद्यातील सर्वसामान्य जनतेच्या राहत्या घरांचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी १९३० मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना केली. १९३०- ३१ मध्ये बडोदा संस्थानात एकूण ४ गृहनिर्माण संस्थांची नोंदणी झाली होती. यापैकी सोजितरा आणि नवसारी येथे २ महाराजा

सयाजीराव आणि सहकार चळवळ / २६