पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहकारी गृहनिर्माण संस्था सर्वसामान्य जनतेसाठी सहकारी तत्त्वावर गृहनिर्माणाचे कार्य करत होत्या. सहकारी तत्त्वावरील घरनिर्मितीसाठी या संस्थांना योग्य दरात भूखंड उपलब्ध होणे ही या गृहनिर्माण संस्थांची प्राथमिक गरज होती. गृहनिर्मितीच्या कार्यासाठी भूखंड खरेदी करता यावी यासाठी बडोदा सरकारने या संस्थांना दीर्घकालीन कर्जपुरवठा योजना सुरू केली.

 बडोद्यात कार्यरत असणाऱ्या या गृहनिर्माण संस्थांना बडोदा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून वित्त पुरवठा केला जात होता. १९३८-३९ मध्ये नवीन ३ सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंद करण्यात आली. गृहनिर्माण संस्थांचे शहरी व ग्रामीण भागात समप्रमाणात विकेंद्रीकरण होईल याची काळजी घेण्यात आली. त्यामुळेच बडोदा शहरात सहा गृहनिर्माण संस्था, नवसारी येथे दोन संस्था व कर्जत, महुवा, कोसंबा आणि कालोल येथे प्रत्येकी एक गृहनिर्माण संस्था गृहनिर्माणाचे काम करत होत्या. गृहनिर्माण संस्थांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण कामामुळे बडोद्यातील सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात घरे मिळणे शक्य झाले हे या संस्थांचे यशच मानावे लागेल.

१०) ग्रामीण पुनर्बांधणी आणि तालुका विकास संस्था

 बडोद्यातील ग्रामीण भागाचा सरंचनात्मक उत्कर्ष घडवून आणण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी १९३३ मध्ये ग्रामीण पुनर्बांधणी संस्थांची स्थापना केली. या ग्रामीण पुनर्बांधणी

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / २७